लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पॅनलप्रमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा एकदा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
एकोणीसपैकी पंधरा जागा सहकार पॅनलला
बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनल उतरले होते. दुसरीकडे आमदार संभाजी पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे आणि आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनल बहुमताने विजयी झाले. एकोणीसपैकी पंधरा जागा सहकार पॅनलला मिळाल्या.
येत्या दोन आठवड्यांत होणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा
गेली पाच वर्षे धीरज देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. या पाच वर्षांत त्यांनी बँकेच्या कार्याचा विस्तार वाढविला. या कामाची दखल घेऊन गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारचे विविध पुरस्कारही बँकेला मिळाले आहेत. निवडणुकीत उतरलेल्या सहकार पॅनलचे नेतृत्वही देशमुख यांनीच केले. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळणार, हे जवळपास निश्चित आहे.
उपाध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत
उपाध्यक्षपदासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव, त्यांचे जावई आणि भाचे असलेले हेमंत जाधव, तसेच धीरज देशमुख यांच्या जवळचे मानले जाणारे सर्जेराव मोरे यांची नावे चर्चेत आहेत. या तीन नावांत सध्या हेमंत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसते.
निवडणुकीत बिनविरोध आणि निवडणुकीतून निवडून आलेल्या एकोणीसपैकी पंधरा संचालक हे नवे आहेत. ते प्रथमच बँकेचे संचालक म्हणून कारभार पाहणार आहेत. सहकार पॅनलमधील धीरज देशमुख, सर्जेराव मोरे आणि जयेश माने, तर परिवर्तन पॅनलमधील भगवानराव पाटील यांनी याआधी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. नव्या दमाच्या पंधरा संचालकांना घेऊन बँकेचे कामकाज कसे चालवले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
Leave a Reply