नंदुरबारमध्ये महिलांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि रोजगार देणाऱ्या उद्योजिका व्हाव्यात, असा निर्धार ‘मातृशक्ती संवाद’ परिषदेत व्यक्त करण्यात आला. ‘विकसित नंदुरबार’ उपक्रमांतर्गत आयोजित नंदुरबार विकास शिखर परिषदेचा भाग म्हणून ही परिषद झाली. नंदुरबार जिल्हा विकास परिषद आणि ‘योजक’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कोरीट नाका येथील भानुधन प्लाझाच्या ओरायझन हॉलमध्ये परिषद पार पडली.
परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा विकास परिषदेचे आशिष वाणी यांनी केले. ‘योजक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभागाचे महत्त्व विशद केले. महिलांनी मांडलेल्या सूचना आणि संकल्पनांचे दस्तऐवजीकरण केले जाईल आणि भविष्यातील विकास योजना तसेच आर्थिक धोरणांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बचत गटांना जागतिक बाजारपेठेची दिशा
उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १६ हजार महिला बचत गटांच्या कामाचा आढावा अनिता सूर्यवंशी यांनी घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीत बचत गटांसाठी स्वतंत्र जागा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सुरेखा वळवी यांनी महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन केले. नंदुरबारमधील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बचत गटांसाठी विक्री मंच विकसित करण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली. माविमच्या कांतागौरी बनकर यांनी महिलांच्या विकासासाठी पाणीपुरवठा आणि बाजारपेठांमधील स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज मांडली.
रोजगारनिर्मिती आणि कृती आराखडा
हंगामी स्थलांतरामुळे महिला कामगारांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर डॉ. सुनंदा पाटील यांनी प्रकाश टाकला. नोकरदार मातांसाठी पाळणाघरे, वसाहतींच्या स्तरावर अभ्यासिका आणि दुर्गम भागांत जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. जयंती देशपांडे, शीतल उत्तरवार आणि चेतना गोसावी यांनी मांडल्या. बोलीभाषांवर आधारित उपक्रम तसेच तोरणमाळ महोत्सवासारखे उपक्रम राबविण्याची गरज क्षमावासी वसईकर यांनी व्यक्त केली.
समारोपात डॉ. गजानन डांगे यांनी महिला सक्षमीकरण आणि जिल्हा विकासासाठी कृती आराखडा मांडला. यात लायन्स व रोटरी क्लबच्या सहकार्याने ५० स्वयंसेवी कायदेशीर सल्ला केंद्रे, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, महिलांची कौशल्य नोंदणी (स्किल रिपॉझिटरी) आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण याबाबतची संकल्पना मांडण्यात आली. परिषदेत जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी, व्यावसायिक व महिला संस्थांनी सहकार्य केले. या वेळी डॉ. तेजल चौधरी, कल्याणी डांगे, पूनम बेडसे आदी उपस्थित होत्या.
Leave a Reply