आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर नवा हल्ला चढवला आहे. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबद्दल उमाळा व्यक्त केल्याचा उल्लेख करत राऊत यांनी या प्रकरणात एफआयआर का दाखल झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
रोहित पवारांनंतर राऊतांचा नवा हल्ला
रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मफलरमॅन म्हणत अजित पवार यांच्या अपघात प्रकरणातील आरोपींना वाचवले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राऊत यांनीही या विषयावर भाष्य करताना तपासाची फाईल दाबली जात असल्याचा आरोप केला. अजित पवार यांच्या अपघाताचा तपास करण्यासाठी सीबीआय का वापरली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या विमान कंपनीच्या मालकाचे विमान अजित पवार यांनी वापरले, त्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री मफलर घेऊन हसत हसत गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
एफआयआर दाखल करून योग्य पद्धतीने तपास केला असता, तर संशय घेण्याचे कारण उरले नसते, असे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्या मृत्यूमागे सूत्र आणि पात्र असून त्यांना वाचवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
महायुतीत आणण्यावरूनही आरोप
अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यासह अनेक आरोप करण्यात आले होते, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अटकेच्या धमक्या देऊन अजित पवार यांना महायुतीत आणले गेले आणि त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवण्यात आली. व्यासपीठावरून याबद्दल माफी मागितली पाहिजे होती, असेही ते म्हणाले. राज्याचे गृहमंत्री क्षुल्लक गोष्टींवर एफआयआर दाखल करायला सांगतात, मात्र या प्रकरणात हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपी मोकाट सोडले असल्याचा दावाही राऊत यांनी केला. या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Leave a Reply