रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध दळवी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अनिकेत तटकरे हे जनतेतून कधीच निवडून येऊ शकणार नाहीत, असा दावा करत दळवींनी त्यांच्या राजकीय वाटचालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तटकरे कुटुंबातील राजकीय वारशावरही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
थेट निवडणूक जिंकता येणार नाही, असा दावा
अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करताना महेंद्र दळवी यांनी सरोगसीचा उल्लेख केला. सरोगसी बाळ या शब्दाचे स्पेलिंग तू लिहून दाखव. मी तुला फळ्यावर सगळे लिहून दाखवतो. त्याची प्रक्रिया सांगतो, असे आव्हान देत त्यांनी खोचक टिप्पणी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, अनिकेत तटकरे जनतेतून कधीच निवडून येणार नाहीत. ते कायम वडील किंवा बहिणीचा हात धरून राजकारणात पुढे येण्याचा प्रयत्न करतील, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या चेहऱ्याबाबतही दळवींनी वादग्रस्त टिप्पणी केली.
कुटुंबाच्या राजकीय वारशावर निशाणा
या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावावरही दळवींनी भाष्य केले. घरात चुलते-पुतणे आणि आता तिसरी पिढीही राजकारणात येत आहे. मग इतरांनी काय फक्त कपडे धुवायचे का, असा सवाल करत त्यांनी तटकरे कुटुंबावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला विरोध नसून तटकरे कुटुंबाला आपला कडवा विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही लक्ष्य केले. सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा इशारा महेंद्र दळवींनी दिला. त्यामुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात तटकरे विरुद्ध दळवी संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दळवींनी यावेळी राजकीय समीकरणांवर भाष्य करत एक आणा, दोन आणे आणि आमचे बारा आणे असा राजकीय हिशेबही मांडला.
तसेच महाराष्ट्राच्या मंत्री असलेल्या तटकरे कुटुंबातील संबंधित महिला नेत्याबद्दल आदर असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. दुसरीकडे, शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. एकंदरीत अनिकेत तटकरे यांच्यावरील वैयक्तिक टीका, तटकरे कुटुंबाच्या राजकीय वारशावर केलेले सवाल आणि सुनील तटकरे यांना पराभूत करण्याचा निर्धार यामुळे रायगडमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
Leave a Reply