मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात रब्बी क्षेत्रात २६ टक्के घट; दुष्काळाचा फटका

धुळे जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात २६.४ टक्क्यांची घट झाली आहे. दुष्काळामुळे क्षेत्र १,०९,३३९ हेक्टरवरून ८०,४५० हेक्टरवर आले असून शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले.

धुळ्यात रब्बी क्षेत्रात २६ टक्के घट; दुष्काळाचा फटका

धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळस्थिती आणि पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून काहीशी आशा बाळगली होती. परंतु अत्यल्प पाऊस आणि जलसाठ्यांच्या तुटवड्यामुळे आता रब्बीच्या पेरणी क्षेत्रालाही मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर केलेल्या सुधारित पेरणी आराखड्यातून ही स्थिती स्पष्ट झाली आहे.

रब्बी क्षेत्रात २६.४ टक्क्यांची घट

कृषी विभागाच्या नियोजनातील आकडेवारीनुसार, रब्बी हंगामात उसासह एकूण सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख नऊ हजार ३३९ हेक्टरवरून घसरून थेट ८० हजार ४५० हेक्टरवर आले आहे. यात तब्बल २६.४ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. उसाचे क्षेत्र वगळता रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र ७९ हजार ९५० हेक्टर असून, या हंगामात उसाशिवाय एकूण ७८ हजार ६३१ टन उत्पादन आणि प्रतिहेक्टरी ९८४ किलो उत्पादकतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पाण्याच्या टंचाईमुळे प्रमुख पिकांच्या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी तृणधान्य वर्गात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४४ हजार ७४० हेक्टरवरून थेट ३३ हजार हेक्टरवर आले आहे. कडधान्य वर्गातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र ३२ हजार १८६.६० हेक्टरवरून २८.५ टक्क्यांनी घटून २३ हजार हेक्टरवर आले आहे.

मात्र कमी पाणी लागणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रब्बी मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मक्याचे क्षेत्र १३ हजार ४७९ हेक्टरवरून ३३.५ टक्क्यांनी वाढून १८ हजार हेक्टरवर पोहोचणार आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वळत असल्याचे यातून दिसून येते.

उन्हाळी हंगामावरही सावट

दुष्काळाची ही दाहकता केवळ रब्बी पुरतीच मर्यादित नसून आगामी उन्हाळी हंगामावरही त्याचे सावट असणार आहे. उन्हाळी हंगामात उसासह चार हजार २१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून, सर्वसाधारण सात हजार ४६९ हेक्टरच्या तुलनेत ही घट तब्बल ४३.६ टक्के इतकी आहे. यात उन्हाळी भुईमूग दोन हजार ५०० हेक्टर, उन्हाळी मका ८०० हेक्टर आणि उन्हाळी बाजरी ७०० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आली आहे. पावसाच्या या दुष्टचक्रामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance