नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांवर भर दिला आहे. ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये ६१ हजार २१५ जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये ४२ हजार ६११ जलतारे उभारण्याचे नियोजन आहे. या कामांमुळे जिल्ह्यातील पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नियोजन
यंदा पावसाने दीर्घ खंड घेतल्यामुळे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामही घटण्याची शक्यता असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेपुढे संकट उभे राहिले आहे. या तेरा तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने १२ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र, संकटाची तीव्रता पाहता जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही कामे हाती घेतली आहेत.
जलतारांसह वनराई व सिमेंट बंधारे, दगडी बांध, शेततळी, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, माती नालाबांध, गाळ काढणे, भूमिगत बंधारे, तलावांचे पुनरुज्जीवन आणि पावसाचे पाणी साठविण्याच्या कामांचा या नियोजनात समावेश आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी अडविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे शक्य होणार आहे.
आदिवासी तालुक्यांत वनराई बंधाऱ्यांना प्राधान्य
पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या डोंगराळ व आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये जलतारा प्रकल्प राबविताना भौगोलिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागांत वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. पेठ तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आतापर्यंत १६३ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे ६ कोटी ७ लाख २ हजार लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसहभागातून गावोगावी कामे हाती घेण्यात येत आहेत. सामाजिक संस्था, संघटना आणि कंपन्यांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.
तालुकानिहाय प्रस्तावित कामे अशी आहेत: बागलाण ४५५०, चांदवड ९८५, देवळा २०३०, दिंडोरी ४३२२, इगतपुरी १४४४, कळवण ३३७२, मालेगाव २१४२०, नांदगाव ३४०६, नाशिक ५२५, निफाड १७६४, पेठ ३१६०, सिन्नर ३७७९, सुरगाणा १४५९, त्र्यंबकेश्वर ४९१४ आणि येवला ४०८५. एकूण ६१ हजार २१५ कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
Leave a Reply