मालेगाव शहरात गेल्या दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला असून, एका रस्ता अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या तिन्ही घटनांची पोलिस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.
घरातच बिघडली प्रकृती
सोयगाव भागात राहणारे विलास नाना सूर्यवंशी (वय ४२) यांची शनिवारी (१४ नोव्हेंबर) रात्री साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या पत्नी सुनीता सूर्यवंशी यांनी त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
रिक्षा चालवताना आला त्रास
भायगाव शिवारात राहणारे गौतम अशोक केदारे (वय ३५) रिक्षा चालवत असताना माळी समाज मंगल कार्यालयाजवळ त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना प्रथम संगमेश्वर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना १३ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास घडली. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
मालेगाव-मनमाड रस्त्यावर मनमाड चौफुलीच्या पुढे कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. पारोळा (जि. धुळे) येथील सचिन सूर्यभान केदार (वय २६) दुचाकीने जात असताना कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सचिनच्या डाव्या हाताला व डोक्याला मार लागला. हा अपघात १३ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. किल्ला पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a Reply