निफाड तहसील कार्यालयातील जुन्या व मोडकळीस आलेल्या अभिलेख कक्षाचे नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्याच्या कामाला सोमवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची अखेर पूर्तता होत असल्याने या आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कारसूळचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी या प्रश्नासाठी बेमुदत उपोषण केले होते, त्याची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे.
सातबारा, फेरफार नोंदी धोक्यात होत्या
निफाड तहसील कार्यालयातील जुन्या अभिलेख कक्षात तालुक्यातील हजारो शेतकरी व नागरिकांच्या जमिनीशी संबंधित सातबारा, फेरफार, जन्म-मृत्यू नोंदी यांसह अनेक महत्त्वपूर्ण शासकीय दस्तऐवज जतन करण्यात आले आहेत. मात्र हा अभिलेख कक्ष जुन्या व जीर्ण इमारतीत असल्याने पावसाळ्यात पाणी लागून महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे नुकसान होण्याची भीती होती. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांशी संबंधित नोंदींच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन काजळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले होते.
दहा लाखांचा निधी मंजूर; प्रशासनाचे आभार
या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पुढील दोन महिन्यांच्या आत अभिलेख कक्ष नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या कामासाठी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही लेखी पत्राद्वारे देण्यात आली होती. आश्वासनानंतरही काजळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, माजी आमदार अनिल कदम आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनीही तहसील प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. अभिलेख कक्ष स्थलांतराच्या कामासाठी विलास कापसे, संतोष त्र्यंबके, रामदास कानडे आणि अमोल कटारे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. दरम्यान काजळे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
Leave a Reply