नंदुरबार येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महान स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती तसेच जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राध्यापक तथा शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद जामकर, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. देवदत्त सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उलगुलान आणि हक्कांचा लढा
या प्रसंगी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर, त्यांनी केलेल्या संघर्षावर आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा, जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी उभारलेले ऐतिहासिक उलगुलान, तसेच आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी केलेले कार्य यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. ‘जय जोहार’ या अभिवादनाचे महत्त्व आणि बिरसा मुंडा यांना बहाल करण्यात आलेल्या ‘जननायक’ या उपाधीचा अर्थ यावेळी स्पष्ट करण्यात आला. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून अन्यायाविरुद्ध आणि हक्कांसाठी दिलेला लढा त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नायक ठरवतो, असे वक्त्यांनी सांगितले.
तरुण पिढीसाठी प्रेरणा
रांची येथील तुरुंगात त्यांना आलेल्या हौतात्म्याचे स्मरण करून त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांचे विचार, शौर्य आणि समाजाप्रति असलेली निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासह समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता योगेंद्र राजपूत यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
Leave a Reply