ठाणे शहरातील उड्डाणपुलांवर उन्हामुळे फुगलेला मास्टिकचा थर वाहनचालकांसाठी मोठी अडचण ठरत होता. अखेर प्रशासनाने मिलिंग मशीनच्या साहाय्याने हे फुगवटे खरवडून काढले. मात्र फुगलेला थर काढल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे मिलिंग केलेल्या भागांवर चिरा पडल्या असून पृष्ठभाग उंच-सखल झाला आहे. या मार्गावरून प्रवास करताना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे आणि अपघाताचा धोकाही वाढला आहे.
ठाणे शहरातील पातलीपाडा आणि माजिवडा उड्डाणपूल तसेच घोडबंदर मार्गावरील विविध पुलांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर करण्यात आला होता. मात्र उन्हाचा तडाखा वाढताच मास्टिकचा थर फुगून वर येऊ लागला. त्यामुळे दुचाकी आणि रिक्षाचालकांना वाहनांवरील नियंत्रण राखताना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने मिलिंग मशीनच्या साहाय्याने फुगलेला थर खरवडून काढला. मात्र मिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून ते सुस्थितीत आणणे आवश्यक असतानाही प्रत्यक्षात डागडुजी झाली नाही.
मिलिंग केलेल्या भागांवर चिरा, खडबडीत पृष्ठभाग आणि उंच-सखल भाग कायम आहेत. या ठिकाणांवरून जाताना दुचाकींचा तोल जाण्याची शक्यता असून वेगाने येणाऱ्या वाहनांसाठीही हे भाग धोकादायक ठरत आहेत. अपघात झाल्यानंतर जाग येण्याऐवजी महापालिकेने तातडीने डागडुजी करून उड्डाणपुलांवरील प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
घोडबंदर मार्गावर मोठी वर्दळ
घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहत असल्याने लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वसई आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत उड्डाणपुलांवरील रस्त्यांची दुरवस्था वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
दरवर्षीचीच समस्या, देखभाल रखडली
दरवर्षी पावसाळ्यात घोडबंदर मार्गावरील पुलांवर खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. मागील वर्षी एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मास्टिक पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले होते. यंदा कापूरबावडी ते गायमुखदरम्यानचा सुमारे १०.५ किलोमीटरचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने या मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यानुसार खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर करण्यात आला. मात्र उष्णतेमुळे हेच मास्टिक फुगल्याने प्रशासनाला ते मिलिंग मशीनच्या साहाय्याने काढावे लागले. मास्टिक हटवण्याची कारवाई झाली; मात्र रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम रखडले आहे.
Leave a Reply