नाशिकमधील राणेनगर येथील अशोका बिझनेस स्कूलमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘मॅनेजमेंट गुरू’ स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील नामवंत विचारवंत आणि लेखक यांच्या योगदानाची ओळख करून देणे, तसेच त्यांच्या विचारांचा व्यावहारिक जीवनात उपयोग करण्याची प्रेरणा देणे हा या स्पर्धेमागील उद्देश होता. महाविद्यालयाचे माजी संचालक डॉ. डी. एम. गुजराथी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानातून शब्दांकडे’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीची ‘ज्ञान से सृजन तक’ अर्थात इन्फोग्राफिक फेरी आणि अंतिम फेरी नुकतीच पार पडली.
तीन फेऱ्यांची स्पर्धा
स्पर्धेतील सहभागी संघात तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये सुधा मूर्ती, डॉ. अब्दुल कलाम, देवदत्त पट्टनायक, पीटर ड्रकर, स्टीफन कोवी, सायमन सिनेक आणि डेल कार्नेगी अशा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ४० व्यवस्थापन गुरूंचा समावेश केला होता. एकूण ३७ संघांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत ‘ज्ञान प्रस्तुती’ या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी सात ते दहा मिनिटांच्या सादरीकरणाद्वारे निवडलेल्या व्यवस्थापन गुरूंचे कार्य आणि विचार मांडले. या फेरीचे परीक्षण डॉ. महेश वाघ आणि डॉ. सुवर्णा शिंदे यांनी केले. या फेरीतून ३७ पैकी २७ संघांची पुढील फेरीसाठी निवड झाली. ‘विद्या संवाद’ या पॉडकास्ट स्वरूपात आयोजित दुसऱ्या फेरीत दृश्य सादरीकरणाऐवजी विद्यार्थ्यांच्या विचारमांडणीला, संवादकौशल्याला आणि विषयाच्या आकलनाला प्राधान्य दिले. या फेरीचे परीक्षण अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके आणि डॉ. परमेश्वर नाथ बिरादार यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. मोनालिसा जैन आणि मधुमिता गोस्वामी उपस्थित होत्या.
विजेते संघ
स्पर्धेत प्रथम पारितोषिक अक्षदा गामणे, महेक कलारिया आणि एनन कुदाई यांच्या गटाने मिळवले. द्वितीय पारितोषिक झोया सय्यद, भार्गवी वाघ आणि जस्मिन शेख यांच्या गटाने, तर तृतीय पारितोषिक संस्कृती वारुंगसे, साक्षी तिडके आणि श्रुती सिंग यांच्या गटाने पटकावले. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनू कोशी आणि वैष्णवी बोरोले यांनी केले. स्पर्धेविषयीची भूमिका प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी मांडली, तर कार्यक्रमाचे संयोजन डॉ. तनुजा दुबे यांनी केले. प्रभारी संचालक डॉ. सुवर्णा शिंदे, डॉ. महेश वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया आणि सचिव श्रीकांत शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply