दोंडाईचा : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने लाल मिरचीच्या शेतीला मोठा फटका दिला आहे. यंदा पिकाचे उत्पादन जवळपास निम्म्याने घटले असून, त्याचा परिणाम दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवकेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. मागणी कायम असताना आवक घटल्याने भाव उसळले आहेत. सध्या ओली आणि अर्धओली लाल मिरची प्रतिक्विंटल साडेपाच हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेदी-विक्रीचे महत्त्वाचे केंद्र आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांची वाढ खुंटली आणि उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्क्यांची घट झाली. पाण्याची कमतरता हेच या घटीचे मुख्य कारण मानले जात आहे. त्यामुळे समितीत येणाऱ्या मिरचीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
तेजी असूनही शेतकरी अडचणीत
बाजार समितीत सध्या दररोज अंदाजे २०० ते ३०० क्विंटल लाल मिरची दाखल होत आहे. आवक कमी असल्याने भाव चढे राहिले आहेत. वरवर पाहता शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याचे दिसते, पण प्रत्यक्षात उत्पादनच कमी झाल्याने त्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नाही. पेरणी, मशागत, खते आणि महागडी औषधे यावर झालेला खर्च लक्षात घेता, सध्याच्या भावातून उत्पादन खर्च भरून निघणे अवघड झाले आहे.
लाल मिरचीकडे शेतकऱ्यांचा ओढा
हिरव्या मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने परिसरातील अनेक शेतकरी आता लाल मिरचीच्या लागवडीकडे वळत आहेत. पुढील दिवसांत आवक थोडी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि पिकांची सध्याची अवस्था यावरच पुढील हंगामाचे चित्र ठरणार आहे.
मिरची व्यापारी बबलू मन्सुरी यांच्या मते, यंदा उत्पादनात ४० टक्क्यांची घट झाली असून ओली मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत. दररोज २० ते ३० वाहने बाजार समितीत येत असून दोनशे ते तीनशे क्विंटल मिरचीची आवक होत आहे. लागवड चांगली झाली होती, पण पावसाअभावी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.
Leave a Reply