एफएफएस प्रणालीची अंमलबजावणी
ऐन हंगामात खतांसाठी दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा, विक्रेत्यांकडून होणारी लिंकिंगची सक्ती आणि काळ्या बाजारामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र शासनाच्या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) या नवीन प्रणालीची धाराशिव जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. या प्रणालीमुळे आता मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या पसंतीच्या खतांचे बुकिंग करता येणार असून, शेतकऱ्यांची धावपळ कमी झाली आहे.
राज्यात या प्रकल्पाचे पहिले दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रणाली वापरणे सुलभ व्हावे, यासाठी कृषी आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्याचे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नवीन प्रणालीचे फायदे
शेतकऱ्यांना घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. मोबाईलमधील एफएफएस अॅपद्वारे खतांची नोंदणी करता येईल, त्यामुळे दुकानांचे वारंवार हेलपाटे वाचतील. शेतकरी आपल्या गरजेनुसार आणि निवडीनुसार खतांचे बुकिंग करू शकणार असल्याने अनावश्यक खते किंवा औषधे घेण्याची सक्ती संपुष्टात येईल. संपूर्ण वितरण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक असल्याने खतांचा कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार थांबण्यास मदत होईल.
गावपातळीवर जनजागृती आणि मदत केंद्रे
शेतकऱ्यांना या अॅपचा वापर कसा करावा हे समजावून सांगण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आणि सहायक कृषी अधिकाऱ्यांमार्फत गावोगावी बैठका घेतल्या जातील. या मोहिमेत कृषी मित्र आणि कृषी सखींचाही सक्रिय सहभाग असणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक, पोस्टर्स आणि व्हिडिओ क्लिप्सद्वारे या प्रणालीची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. खत बुकिंग करताना तांत्रिक अडचणी आल्यास तत्काळ मदतीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वतंत्र हेल्पडेस्क स्थापन केले जात आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकही लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत. जमिनीच्या मालकी हक्कावरून किंवा खत वितरणादरम्यान काही वाद उद्भवल्यास, त्यावर जागेवरच तोडगा काढण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांची विवाद निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a Reply