जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे ५१ वर्षीय शेतकरी रमेश पंढरीनाथ खरमाळे यांनी पुण्यात झालेल्या युनिटी महा मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. वयाच्या ५१ व्या वर्षीही त्यांनी राखलेली तंदुरुस्ती आणि धावण्याची तयारी यामुळे त्यांच्या यशाची चर्चा गावासह जिल्ह्यात होत आहे.
४६ मिनिटांत दहा किलोमीटर
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ४१ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. खरमाळे यांनी ४५ वर्षांवरील वयोगटात दहा किलोमीटरचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पूर्ण केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
२५० हून अधिक मॅरेथॉनचा अनुभव
खरमाळे यांची खोडद येथे दहा एकर शेती आहे. शेती सांभाळत त्यांनी धावण्याचा सराव सुरू ठेवला आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात २५० हून अधिक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असून, त्यापैकी १७५ स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. २०२५ मध्ये त्यांनी एकाच वर्षात २७ मॅरेथॉन जिंकण्याचा विक्रम केला होता. २०२६ मध्ये आतापर्यंत त्यांनी १९ मॅरेथॉन जिंकल्या असून, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सुवर्णपदकेही मिळवली आहेत.
गेल्या १४ वर्षांपासून ते दररोज १५ किलोमीटर धावण्याचा सराव करतात. सातत्यपूर्ण सराव आणि शिस्तबद्ध दिनचर्या हेच त्यांच्या यशाचे रहस्य मानले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण भागात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
Leave a Reply