मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मयूरी देशमुख ओळखली जाते. खासगी आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. पतीच्या निधनानंतर तिला मोठा धक्का बसला होता. आता मयूरी तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मयूरीने मोठा खुलासा केला आहे.
लोकप्रियता टिकवणे हा माझा कल नव्हता
मयूरी देशमुखने मुलाखतीमध्ये म्हटले की, लोकप्रियता टिकवणे हा आपला कल नव्हता. याबाबतीत आपण प्रचंड प्रामाणिक असल्याचे तिने सांगितले. आपण काम चांगले केले, तर आपण लोकांना पसंत पडू, असा तिचा विश्वास आहे. चर्चेत रहावे म्हणून काही करणे हा आपला पिंड नसल्याचे तिने स्पष्ट केले.
त्यामुळे सोशल मीडियावाले किंवा पीआरवाले आपल्याला अनेकदा म्हणतात की, जा जरा पार्टीला, रहा चर्चेत. मात्र, आपले मत वेगळे असल्याचे मयूरी म्हणाली. त्यामुळे तो ट्रॅक जरा स्लो असेल, असेही तिने मान्य केले.
कामातूनच लोकप्रियता मिळावी
मयूरीचे म्हणणे आहे की, कामातूनच लोकप्रियता मिळाली पाहिजे. त्यामुळे तिला कल टिकवणे हे लोकप्रियतेपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते. चांगले काम मिळवणे हा तिचा अट्टाहास आहे. जे काम मिळवले, त्याच्यामध्ये आधीच्या कामापेक्षा चांगले काम करणे, असेही मयूरी म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, कलाकार म्हणून वाढणे हा आपला नेहमी केंद्रबिंदू होता. त्याच्या भोवती हे सगळे येते. लोकप्रियता त्यातून येते. लोकप्रियता टिकवावी म्हणून आपण विशेष प्रयत्न केलेले नाहीत, असे तिला वाटते. सोशल मीडिया अकाऊंटसारख्या बेसिक गोष्टी तिने केल्या आहेत. कारण ते आता अनिवार्य झाले आहे आणि चाहत्यांशी संवाद साधावा लागतो. नाही तर आपण खूप खासगी माणूस असल्याचे तिने सांगितले. आवड म्हणून आपण कधीच इन्स्टाग्रामवर नसल्याचेही ती म्हणाली.
मयूरी ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. तिची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या या खुलाशाची चर्चा होत आहे.
Leave a Reply