पुण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉनवरून आता राजकीय वाद पेटला आहे. या मॅरेथॉनसाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपये दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मॅरेथॉनसाठी ५० लाख रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुण्यात १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकर तसेच केनियासह विविध आफ्रिकन देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेची सुरुवात अलका टॉकीज चौकातून झाली. ही मॅरेथॉन फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि पाषाण रस्ता यांसारख्या प्रमुख मार्गांवरून पार पडली. राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि नशामुक्त समाजाचा संदेश देणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू होता.
धंगेकरांचा सवाल: आयुक्तांनी पैसे दिले तरी कसे?
पुणे महानगरपालिकेने या संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनासाठी ५० लाख रुपये दिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्तांनी हे पैसे दिले तरी कसे, असा सवाल धंगेकर यांनी केला आहे. धंगेकरांनी मोहोळांवर टीका करताना आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी म्हण वापरली. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मॅरेथॉनसाठी ५० लाख रुपये खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील राजकीय वातावरण तापले
या मुद्द्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धंगेकरांच्या टीकेला आता मुरलीधर मोहोळ काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, तर दुसरीकडे त्यावरील खर्चावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. येत्या काळात या वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.
Leave a Reply