सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर कोसळली. या दुर्घटनेत चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावात निवास शिंदे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. जवळपास ३० फूट खोल विहीर खोदण्यात येत असताना अचानक विहिरीतील दगड व मातीचा मोठा ढिगारा तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. हा अपघात इतका अचानक घडला की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची किंवा बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. हे सर्व कामगार सध्या दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाचे बचावकार्य
या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बचावकार्यास वेग देण्यासाठी लवकरच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबतची कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Leave a Reply