बीड जिल्हा रुग्णालयात एका नवजात बाळाच्या जगण्याची ४१ दिवसांपासून सुरू असलेली लढाई आता आशेच्या वळणावर आली आहे. जन्माला येताच आईने सोडून दिलेल्या या बाळाला रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी स्वतःच्या खर्चातून उपचार करून नवे जीवन दिले आहे. बाळाची प्रकृती आता सुधारत असून, आठवडाभरात त्याला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे.
शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या ४० वर्षीय गतिमंद महिलेने या बाळाला जन्म दिला होता. मात्र, प्रसूतीनंतर ती रुग्णालयातून निघून गेली आणि तेव्हापासून तिचा कोणताही ठावठिकाणा नाही. जन्माच्या क्षणापासूनच बाळ आईच्या मायेपासून दूर राहिले.
दीड किलो वजन, जन्मताच गंभीर अवस्था
बाळाचे जन्माचे वजन अवघे दीड किलो होते आणि त्याची प्रकृती जन्मताच अत्यंत गंभीर होती. अशा नाजूक अवस्थेत त्याला तातडीच्या आणि सातत्यपूर्ण उपचारांची गरज होती. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपचार सुरू केले, तर परिचारिकांनी बाळाची दिवस-रात्र काळजी घेतली.
स्वखर्चातून उपचार, मायेची ऊब
बाळाच्या उपचारासाठी लागणारा खर्च डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातून केला. परिचारिकांनीही त्याला मायेची ऊब दिली आणि त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले. या सगळ्या प्रयत्नांमुळे बाळाच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे.
बाळाचा जीव वाचला असला, तरी आता त्याच्या पुढील संगोपनाचा आणि सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर बाळ कुठे जाणार आणि त्याचे संगोपन कोण करणार, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
Leave a Reply