सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रायगडात राष्ट्रवादीला धक्का; चार नेते शिवसेनेत जाणार

रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोमवारी रोह्यात राष्ट्रवादीचे चार नेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

रायगडात राष्ट्रवादीला धक्का; चार नेते शिवसेनेत जाणार

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आता पुन्हा रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले हे सुनील तटकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सोमवारी रोहा येथे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१७ वर्षांनंतर घरवापसी

मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी तब्बल १७ वर्षांनंतर घरवापसी म्हणजेच शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि आप्पा देशमुख यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. प्रमोद म्हसकर हे पेण विधानसभा कार्याध्यक्ष असून ते पंचायत समिती सदस्य आहेत. तर आप्पा देशमुख हे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगडमधील राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगडच्या समीकरणांवर परिणाम?

रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे रोह्यातील या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा पक्षप्रवेश विलिनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने त्याची राजकीय चर्चा अधिकच वाढली आहे. या पक्षप्रवेशानंतर रायगडच्या राजकीय समीकरणांमध्ये नेमके कोणते बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance