मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

तळेगाव सहकारी प्रकल्पासाठी १५०० कोटी; भारत टॅक्सी सुरू

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तळेगावच्या बंद सहकारी अभियांत्रिकी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले; पुण्यात भारत टॅक्सी सेवा सुरू.

तळेगाव सहकारी प्रकल्पासाठी १५०० कोटी; भारत टॅक्सी सुरू

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड पुन्हा सुरू करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यात सहकार मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाची सुरुवात झाली असून, पुण्यासाठी सहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. तळेगाव येथे या संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि भारत टॅक्सी सेवेच्या प्रारंभप्रसंगी शाह बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे आणि केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.

बंद पडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होणार

तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही एक महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था असून ती बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२७ मध्ये उत्पादन सुरू होईल. या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना लागणारी यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राची औद्योगिक क्षमता वाढण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. सहकारी संस्थांनी केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता औद्योगिक उत्पादन क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे शाह यांनी सांगितले.

पुण्यात पश्चिम विभागीय कार्यालय

पुण्यात सुरू करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयामुळे बहुराज्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच प्रशासकीय व नियामक सेवा उपलब्ध होणार आहेत. या कार्यालयामुळे सहकारी संस्थांच्या नोंदणीसह विविध प्रशासकीय कामकाजात सुलभता येईल. संस्थांच्या कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. सहकारी संस्थांना त्यांच्या अडचणींसाठी दूरवर जावे लागणार नाही, तर पश्चिम विभागातील संस्थांना स्थानिक पातळीवरच आवश्यक मार्गदर्शन आणि सेवा मिळू शकतील. महाराष्ट्राच्या भूमीत विठ्ठलराव विखे पाटील आणि वैकुंठभाई मेहता यांच्यासारख्या सहकारमहर्षींनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवून ही चळवळ रुजविली. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा उपयोग देशातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी होणे आवश्यक आहे. पुण्यातील हे कार्यालय त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

भारत टॅक्सीमध्ये चालकच मालक

भारत टॅक्सी सेवेच्या प्रारंभाबाबत शाह म्हणाले की, सहकाराच्या तत्त्वावर आधारित परिवहन सेवा विकसित करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या सेवेत टॅक्सीचालक म्हणजेच सारथी यांचा सहभाग, मालकी हक्क आणि आर्थिक भागीदारी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये चालकांना मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध प्रकारचे कमिशन द्यावे लागते. मात्र, सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित भारत टॅक्सीच्या माध्यमातून सारथींना त्यांच्या सेवेवर मालकी हक्क मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेमुळे चालकांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच प्रवाशांनाही वाजवी दरात सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकारी व्यवस्थेत सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि मालकीची भावना दृढ करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance