कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. तो तैवानला रवाना झाला असून, तेथे संशोधन कार्य करणार आहे.
या कालावधीत तो डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपकरणांसाठी अर्धवाहक उत्पादन या विषयावर संशोधन करणार आहे. यशच्या प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठच करणार आहे. तैवानला इंटर्नशिपसाठी जाणारा यश हा ७६ वा विद्यार्थी ठरला आहे.
सत्कार आणि अभिनंदन
यशला मिळालेल्या संधीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी त्याचे आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते यश आणि त्याचे वडील संजय नन्नावरे, आई उज्ज्वला नन्नावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी आणि विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.
यशने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि संजीवनीतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी मिळाव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे.
यापूर्वीही विद्यार्थ्यांना परदेशात संधी
यापूर्वीही संजीवनीच्या विद्यार्थ्यांना रशिया, तैवान, कॅनडा, फिलिपाइन्स, ट्युनिशिया आणि युनायटेड किंगडम येथील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीचे हे फलित असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून, भविष्यात जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Leave a Reply