लोककलेचा वारसा जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांवर प्रशासकीय अनास्थेमुळे मानधनासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून वृद्ध कलावंत निवड समितीच गठित करण्यात आलेली नाही. परिणामी, सुमारे पंधराशे कलावंतांचे प्रस्ताव ऑनलाइन प्रक्रियेत अडकून पडले आहेत, अशी माहिती खानदेश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ यांनी दिली.
शेजारील जळगाव जिल्ह्यात दोनशे वृद्ध कलावंतांचे मानधन प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तेथील निवड समितीने हे प्रस्ताव मंजूर करून सांस्कृतिक विभागाकडे पाठवले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे शहर व ग्रामीण भागातील असंख्य कलाकार अद्यापही मानधनापासून वंचित आहेत.
मानधनाअभावी कलावंतांचे हाल
मानधनाअभावी ज्येष्ठ कलाकार कर्जबाजारी झाले असून अनेकांचे औषधोपचाराविना हाल होत आहेत. आयुष्यभर समाजप्रबोधन करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक विवंचनेत जगावे लागत आहे. काही कलावंतांचा तर मानधनाच्या प्रतीक्षेत मृत्यूही झाला आहे, असे शेषराव गोपाळ यांनी नमूद केले.
दरमहा पाच हजार रुपये मानधनानुसार एका कलावंताचे तीन वर्षांत सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील कलावंतांना कधी न्याय मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
या प्रश्नी पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी शेषराव गोपाळ यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यात वृद्ध कलावंत निवड समिती लवकरात लवकर गठित करून रखडलेले प्रस्ताव मंजूर करावेत, अशी अपेक्षा कलावंतांकडून व्यक्त होत आहे.
Leave a Reply