देशातील शेअर बाजारातील व्यवहार सुलभ करणाऱ्या आघाडीच्या ब्रोकरेज कंपनी एंजल वनने सक्रिय ग्राहकांच्या संख्येत मोठी झेप घेतली आहे. कंपनी आता सक्रिय ग्राहकांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, तिच्या ग्राहकसंख्येने ६९.९८ लाखांचा टप्पा गाठला आहे. एक्स्चेंजवरील एकूण ४.६७ कोटी सक्रिय ग्राहकांपैकी कंपनीकडे १४.९७ टक्के वाटा आहे.
ग्राहकवाढीचा वेग कायम
एनएसईच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात कंपनीने २.४३ लाख सक्रिय ग्राहक जोडले. कंपनीचा एकूण ग्राहकवर्ग चार कोटी ६० लाखांवर पोहोचला असून, त्यात वार्षिक १७.४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. व्यवहारातील सरासरी दैनंदिन आदेश मासिक आधारावर १९.६ टक्क्यांनी वाढून ६९ लाखांवर पोहोचले आहेत. या तिमाहीत कंपनीने जवळपास १५ लाख नवीन ग्राहक जोडले, जे मागील तिमाहीच्या तुलनेत ११.६ टक्के अधिक आहेत. सप्टेंबरअखेर कंपनीचा ग्राहकवर्ग ३.९९ कोटी होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याने चार कोटींचा टप्पा पार केला.
महसूल आणि नफ्यात भरीव वाढ
कंपनीला कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल वार्षिक आधारावर १८.७ टक्क्यांनी वाढून १,४२७ कोटी रुपयांवर पोहोचला, तर निव्वळ नफा ५८.२ टक्क्यांनी वाढून ३३५ कोटी रुपये झाला. ग्राहक निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नाने एकूण महसुलात ३५.६ टक्के योगदान दिले. कंपनीच्या संपत्ती व्यवस्थापन व्यवसायाचाही विस्तार सुरू असून, व्यवस्थापनाखालील मालमत्ता तिमाही आधारावर १९.१ टक्के आणि वार्षिक आधारावर १६०.५ टक्क्यांनी वाढून १६ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Leave a Reply