नाशिकमध्ये रविवारी छटपूजेसाठी गोदाकाठावर आलेल्या काही भाविकांनी आदल्या दिवशी रामतीर्थ परिसरातील जुन्या दगडी घाटाच्या पायऱ्यांवर ऑइल पेंटने स्वतःची नावे लिहून खुणा केल्या आणि रंगाचे पट्टे मारून जागा राखून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत असून पवित्र घाटांचे विद्रुपीकरण झाल्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सणाचा आदर, पण कृत्य निंदनीय
छटपूजा हा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा पारंपरिक धार्मिक सण आहे. या सणाला कोणाचाही विरोध नाही. मात्र सार्वजनिक आणि ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करून त्या जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याच्या प्रवृत्तीला विरोध असल्याची भूमिका गोदाप्रेमींनी मांडली आहे. रामतीर्थ परिसरातील घाटांना मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी घाटावरील मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता, तर पेशव्यांच्या काळात गोपिकाबाई यांनी गोदाकाठच्या धार्मिक वास्तूंच्या उभारणीत योगदान दिले होते. अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी रंगाने नावे लिहिण्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
मनसेचा निषेध, प्रशासनाकडे लक्ष
मनसेचे पदाधिकारी मनोज घोडके यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत घाटावर नावे लिहिण्याच्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. सामाजिक स्तरातूनही सार्वजनिक घाटांवर अशा प्रकारे नावे लिहून जागा अडविण्याच्या प्रकाराला विरोध दर्शविला जात आहे. गोदाप्रेमी देवांग जानी यांनी घाटावरील रंग काढण्याची आणि नुकसान करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवा आणि गोपिकाबाई पेशवा यांनी हे घाट बांधले, त्यांची नावे घाटावर नाहीत; मग बाहेरून आलेले लोक जागा कशी राखून ठेवू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाचे पडसाद केवळ नाशिकपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि बदलापूर यांसारख्या ठिकाणीही छटपूजेच्या आयोजनातील सार्वजनिक जागांच्या वापरावरून वाद निर्माण झाले आहेत. छटपूजेच्या धार्मिक परंपरेचा सन्मान राखतानाच ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी होत आहे.
Leave a Reply