अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची इच्छा असलेल्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता थेट गावातून अयोध्येपर्यंत जाणारी विशेष बससेवा सुरू केली आहे. रेल्वेचे आरक्षण मिळवण्याची चिंता न करता भाविकांना थेट गावातून यात्रेला निघता येणार आहे.
## ग्रुप तयार झाल्यास बस थेट गावात येणार
महामंडळाने प्रासंगिक करारांतर्गत ही विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांचा किमान ४० जणांचा ग्रुप तयार झाल्यास एसटी बस थेट संबंधित गावात येऊन भाविकांना अयोध्येच्या यात्रेसाठी घेऊन जाणार आहे. स्लीपर बससाठी किमान ३० प्रवाशांची अट आहे. कुटुंबीय, मित्रमंडळी, भजनी मंडळे, महिला बचत गट आणि धार्मिक संस्थांना एकत्रितपणे तीर्थयात्रेचे नियोजन करणे यामुळे सोयीचे होणार आहे.
## किलोमीटरनुसार भाडे, २० टक्के आगाऊ रक्कम
अयोध्या यात्रेसाठी बसच्या प्रकारानुसार किलोमीटरच्या आधारे भाडे आकारले जाते. बसने प्रत्यक्ष किती अंतर पार केले, याची नोंद स्पीडोमीटरद्वारे केली जाते आणि त्यानुसार अंतिम बिल तयार होते. बस आरक्षित करताना एकूण अंदाजित रकमेच्या २० टक्के रक्कम आगाऊ जमा करावी लागते. प्रवाशांच्या संख्येनुसार बसची निवड करता येते.
## काशी-प्रयागराज आणि ज्योतिर्लिंग दर्शनाचीही संधी
ही सुविधा केवळ अयोध्येसाठीच मर्यादित नाही. भाविकांना काशी विश्वनाथ, प्रयागराज तसेच सहा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठीही विशेष पॅकेज टूरचे नियोजन करता येते. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे प्रवासाचा मार्ग आणि दर्शनस्थळे निश्चित केली जातात. प्रवाशांच्या मागणीनुसार इतर राज्यांतील तीर्थक्षेत्रांसाठीही विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या विशेष प्रवासासाठी प्रतिप्रवासी दहा लाख रुपयांचा विमा काढण्याची सुविधा आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांचे आवश्यक परमिट महामंडळाकडून काढून दिले जातात. मात्र, प्रवासादरम्यान लागणारा टोल, पार्किंग शुल्क आणि लागू असलेले कर यांचा खर्च प्रवासी ग्रुपला करावा लागतो. निवास आणि भोजनाची व्यवस्था प्रवाशांनी स्वतःच्या खर्चाने करायची आहे.
महिला सन्मान योजनेंतर्गत एसटीच्या नियमित प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत मिळते. ज्येष्ठांसाठी वयानुसार ५० टक्के किंवा शंभर टक्के सवलतीची तरतूद आहे. मात्र, आंतरराज्यीय प्रवासासाठी किलोमीटरनुसार भाडे आकारल्या जाणाऱ्या या विशेष बससेवेत या सवलती कशा लागू होणार, याबाबत आगाराकडून अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. महिला सन्मान योजनेची सवलत महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच लागू असल्याने उत्तर प्रदेशातील प्रवासासाठी ती लागू होत नाही, असे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
Leave a Reply