नंदुरबारमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी विजयपर्व येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. समिधा नटावदकर, प्रा. मकरंद पाटील आणि शहाद्याच्या उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
## पक्षवाढीसाठी एकजुटीचे आवाहन
आमदार पाडवी म्हणाले, की विजय चौधरी यांची पक्षाविषयीची तळमळ मोठी आहे. पक्ष आणखी मोठा व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखाची, वैयक्तिक अडचणींची आणि पक्षकार्याची ते विचारपूस करतात. हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी पावती असल्याचे पाडवी यांनी सांगितले.
## कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही
विजय चौधरी म्हणाले, की भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात आणि संकटकाळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा व राज्याचा कारभार सुरळीत सुरू असून, सरकार जनहिताला प्राधान्य देत विविध विकासकामे राबवत आहे. शासनाच्या विकासकामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष नीलेश माळी म्हणाले, की विजय चौधरी हे कुशल संघटक असून पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देतात. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पक्षाचे आगामी कार्यक्रम आणि संघटनात्मक नियोजन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply