धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेचा तडाखा ओसरल्यानंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हवेत गारवा वाढला आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवत असून नागरिकांनी स्वेटर आणि जॅकेट यांसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. रविवारी जिल्ह्यातील किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
## थंडीचा नागरिकांच्या दिनचर्येवर परिणाम
सायंकाळनंतर गार वारे वाहू लागल्याने चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढली आहे. लहान मुले कानटोप्या आणि स्वेटर वापरताना दिसत आहेत. सकाळी व्यायाम आणि चालण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली असून अनेकजण थंडीतील फिरण्याचा आनंद घेत आहेत.
## रब्बी पिकांसाठी थंडी पोषक
वाढती थंडी कांदा, ज्वारी आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी पोषक ठरत आहे. सध्या शेतामध्ये कांद्याचे पीक वाढीच्या अवस्थेत असून कांद्याची फुगवण होण्यासाठी थंड हवामान अनुकूल असल्याचे शेतकरी सांगतात. दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारीचे पीक तग धरण्यासाठीही थंडी फायदेशीर ठरत आहे. या हवामानामुळे पिकांची वाढ चांगली होण्यास आणि कांद्याची प्रत सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आगामी काळात किमान तापमानात आणखी घट झाल्यास रब्बी पिकांना त्याचा आणखी फायदा होऊ शकतो.
Leave a Reply