हिंगोली जिल्ह्यात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूजलसाठा वाढवण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. सततची अवर्षणस्थिती आणि पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील भूजलपातळी सातत्याने खालावत चालली आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी तब्बल तीन मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा राहिला असून, येत्या काळात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी जलतारा खड्डेनिर्मितीला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्यात यंदा तब्बल ३० हजार जलतारा खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी २० हजार खड्ड्यांचे नियोजन पूर्ण झाले असून, या मोहिमेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हीबीजी रामजी योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत. एका एकर शेती क्षेत्रासाठी एक जलतारा खड्डा घेण्यास मान्यता दिली जाते. अर्जांची आणि खड्ड्यांच्या युनिटची नोंद युक्तधारा पोर्टलवर केली जात आहे. आतापर्यंत सुमारे २० हजार ५६५ खड्ड्यांची नोंद झाली असून, उद्दिष्टानुसार ही संख्या ३० हजारांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
खड्डा कसा तयार केला जातो
जलतारा खड्डा हा सिंचन विहिरीच्या परिसरात तयार केला जातो. यासाठी पाच फूट लांब, पाच फूट रुंद आणि सहा फूट खोल खड्डा खोदला जातो. पाणी सहजपणे जमिनीत मुरावे, यासाठी खड्ड्याच्या तळाशी मोठे दगड, त्यावर मध्यम आकाराचे दगड आणि सर्वांत वर लहान खडी किंवा वाळूचे थर दिले जातात. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी खड्ड्यात साचून हळूहळू जमिनीत झिरपते आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होते. पात्र लाभार्थ्यांना एका जलतारा खड्ड्यासाठी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एका एकर शेती क्षेत्रासाठी एक खड्डा घेता येतो.
तालुकानिहाय नोंदणीची स्थिती
या मोहिमेचा आढावा तालुका स्तरावर पंचायत समित्यांमार्फत घेतला जात आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही पंचायत समित्यांच्या यंत्रणेमार्फत गाव स्तरावर ग्रामविकास अधिकारी, अभियंता आणि रोजगार सेवकांना शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंतची तालुकानिहाय नोंद अशी आहे: औंढा नागनाथ येथे २१६५ शेतकऱ्यांनी ४७९२ खड्डे, वसमत येथे १९३८ शेतकऱ्यांनी २७६२ खड्डे, हिंगोली येथे १६३५ शेतकऱ्यांनी ३९८८ खड्डे, कळमनुरी येथे १२२० शेतकऱ्यांनी ३२११ खड्डे आणि सेनगाव येथे ४९५ शेतकऱ्यांनी ९७८ खड्ड्यांची नोंद केली आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्याच्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
Leave a Reply