समान नागरी कायद्याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनातील आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावर ही सुनावणी होणार आहे. जनसुनावणीत संबंधित गट आणि संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय जनसुनावणीसाठी भेट देणार आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट, सहजीवन नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क व उत्तराधिकारी हक्क या विषयांबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.
जिल्हानिहाय वेळापत्रक
सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले आहे. २१ नोव्हेंबरला मुंबई शहर सकाळी ११ ते दुपारी १२, मुंबई उपनगर दुपारी १२.३० ते १.३०, पालघर दुपारी ३ ते ४ आणि सिंधुदुर्ग दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत जनसुनावणी होईल. २२ नोव्हेंबरला ठाणे सकाळी ११ ते दुपारी १२, रायगड दुपारी १२.३० ते १.३० आणि रत्नागिरी दुपारी ३ ते ४ या वेळेत सुनावणी होईल.
जनसुनावणीसाठी नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.
Leave a Reply