रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बीडमध्ये भूजल पातळीत साडेचार मीटर घट; बोअरवेलला बंदी

बीड जिल्ह्यात भूजल पातळीत साडेचार मीटर घट झाल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. परवानगीशिवाय बोअरवेल मारल्यास मशीन जप्त व फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.

बीडमध्ये भूजल पातळीत साडेचार मीटर घट; बोअरवेलला बंदी

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या असून भूजल पातळीत तब्बल साडेचार मीटरची घट झाली आहे. पाणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशावर कारवाईचा इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात कुठेही बोअरवेल घेण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे.

विनापरवाना बोअरवेल मारल्यास मशीन जप्त

छुप्या मार्गाने बोअरवेल मारल्यास मशीन थेट जागेवरच जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. पाण्याची घटती पातळी आणि अनिर्बंध उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी रसातळाला गेली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट उभे राहू नये, यासाठी प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. बीड तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील तब्बल २२ बोअरवेल मशीन मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

परवानगीसाठी १८६ अर्ज; कोणती कागदपत्रे लागतात?

कायदेशीर मार्गाने परवानगी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शनिवारपर्यंत केवळ बीड तहसील कार्यालयात कायदेशीर परवानगीसाठी १८६ अर्ज दाखल झाले आहेत. परवानगीसाठी शेतीचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा आवश्यक आहे. शेतात फळबाग असल्यास त्याची ७/१२ उताऱ्यावर कायदेशीर नोंद असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याअभावी जे पीक जळत आहे किंवा सुकत आहे, त्याची उताऱ्यावर स्पष्ट नोंद असणे गरजेचे आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महसूल विभागाने आपली यंत्रणा सतर्क केली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance