नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. आदित्य अतुल वडगावकर यांनी वैद्यकीय सेवा आणि संशोधनातील योगदानाच्या जोरावर जर्मनीचे नागरिकत्व मिळवले आहे. त्यांचा प्रवास नाशिकच्या किलबिल शाळेतून सुरू झाला. दहावीनंतर आरवायके महाविद्यालयात शिक्षण घेत त्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तर महाराष्ट्रात प्रथम आणि संपूर्ण महाराष्ट्रात अकरावा क्रमांक पटकावला. या यशामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. पदवी पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची दोन महिन्यांची व्हिजिटिंग स्टुडंट शिष्यवृत्ती मिळाली.
## कोरोनाकाळात जर्मनीकडे वळलेला प्रवास
ऑक्सफर्डमध्ये असतानाच कोरोनाची पहिली लाट आली आणि जगभरात लॉकडाउन जाहीर झाले. युकेतील रुग्णालयांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण थांबवले आणि भारतात परतण्याचे मार्गही बंद झाले. या कठीण काळात जर्मनीतील एका प्राध्यापकांशी त्यांचा परिचय झाला. त्यांनी आपल्या विद्यापीठ रुग्णालयात येण्याचे निमंत्रण दिले. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीच्या विशेष नियमांनुसार त्यांना जर्मनीचा तात्काळ व्हिसा मिळाला आणि तेथील ऑर्थोपेडिक्स विभागात कोविड काळातील वैद्यकीय सेवेत त्यांनी मदत केली. नंतर भारतात परतून त्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये सहा महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर ऑर्थोपेडिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी ते पुन्हा जर्मनीला गेले. आवश्यक वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना तिथेच ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमा सर्जन म्हणून कायमस्वरूपी प्रशिक्षणाची संधी मिळाली. सध्या या सहा वर्षांच्या प्रशिक्षणाच्या पाचव्या वर्षात असून, त्यांचे पीएचडी संशोधनही पूर्ण झाले आहे.
## महापौरांकडून गौरव आणि मायदेशी सेवेचा ध्यास
जर्मनीतील मॅनहाइम शहरात वास्तव्यास असताना वैद्यकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन त्यांना नागरिकत्व बहाल करण्यात आले. नागरिकत्व मिळाल्यानंतर दरवर्षी शहराच्या महापौरांकडून नवीन नागरिकांचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी नागरिकत्व मिळालेल्या सुमारे दीड हजार लोकांमधून वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन महापौरांनी संवाद साधण्यासाठी निवडलेल्या तीन प्रमुख व्यक्तींमध्ये डॉ. वडगावकर यांचा समावेश होता. स्थानिक जर्मन वृत्तपत्रातही त्यांच्या प्रवासाची विशेष दखल घेण्यात आली. वडिलांचा वैद्यकीय वारसा आणि प्रस्थापित रुग्णालय असतानाही केवळ तयार वारसा पुढे न चालवता स्वतःच्या हिमतीवर वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून त्यांनी जर्मनी गाठले. जर्मनीमध्ये ऑर्थोपेडिक्स आणि इम्प्लांट्सचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत असून, तेथील आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान शिकून भविष्यात नाशिकमधील रुग्णालयात आणि भारतातील रुग्णांना जागतिक दर्जाची उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मनीसारख्या युरोपीय देशांमधील संधींकडेही लक्ष द्यावे, संयम ठेवावा आणि स्थानिक भाषा शिकावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Leave a Reply