हिवाळ्यातील गुलाबी थंडी, उबदार कपडे आणि गरमागरम चहाचा आनंद प्रत्येकालाच आवडतो. मात्र, या ऋतूत थंड आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्यापैकीच एक म्हणजे केसांमधील कोंडा. टाळू कोरडी पडल्यामुळे केसांमध्ये पांढरा कोंडा दिसू लागतो. तसेच खाज आणि अस्वस्थतेचाही त्रास होऊ शकतो. कोंड्यामुळे केसांचे सौंदर्यही कमी होते. तुम्हालाही हिवाळ्यात या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर महागडे शॅम्पू किंवा केमिकल ट्रीटमेंट घेण्याआधी काही सोपे घरगुती उपाय करून पाहता येतील.
कोमट तेलाने मसाज आणि टी ट्री ऑइल
हिवाळ्यात कोंड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोमट तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल हलके गरम करा. या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. या नैसर्गिक तेलांमुळे टाळूला आवश्यक ओलावा मिळेल आणि कोंड्याची समस्या कमी होईल. टी ट्री ऑइल कोंडा कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून केस धुवा. तसेच तुमच्या हेअर ऑइलमध्येही टी ट्री ऑइलचे काही थेंब घालून ते केसांना लावा. टी ट्री ऑइल थेट केसांना कधीच लावू नये. ते इतर तेलात मिसळून लावावे. हे तेल थेट लावल्याने जळजळ आणि खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.
कोरफड, लिंबू आणि मेथी
केसांसाठी एलोवेरा जेल खूप चांगले मानले जाते. कोंडा दूर करण्यासाठी केसांच्या मुळांवर ताजी कोरफड लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. कोरफड फक्त कोंडा कमी करत नाही, तर केसांच्या इतर समस्या आणि टाळूची खाजही कमी करते. तुमच्या जेवणाची चव वाढवणारे लिंबू केसातील कोंडा दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. लिंबाचा रस टाळूचा पीएच संतुलित करून कोंड्याशी लढण्यास मदत करतो. लिंबाचा रस कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. पाच ते दहा मिनिटांनी केस चांगले धुवा. हा खूप प्रभावी उपाय मानला जातो. केसांसाठी मेथीही प्रभावीपणे काम करते. मेथीमधील अँटी फंगल गुण कोंडा दूर करण्यास मदत करतात. मेथी रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी या मेथीची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. साधारण एक तासानंतर केस धुवा. केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. विशेषतः टाळूवर जळजळ, जखम किंवा तीव्र खाज असेल, तर घरगुती उपायांऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply