भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर येणार आहेत. दिल्लीत २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या शंघाई सहकार्य संघटनेच्या परिषदेत ते पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतील. पाकिस्तानने शनिवारी या दौऱ्याची घोषणा केली. २०२३ नंतर पाकिस्तानच्या एखाद्या मंत्र्याचा हा पहिला भारत दौरा ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर हा तणाव आणखी वाढला होता. त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरही दोन्ही देशांमधील संबंध सुधारलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संबंध सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत भारतासोबतचे संबंध सुधारायचे आहेत, असे तेथील भूमिकेतून स्पष्ट होत आहे.
२०२३ नंतर पहिला मंत्री दौरा
२०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे शंघाई सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी गोव्यात आले होते. त्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. मात्र, त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मंत्र्यांच्या पातळीवर कोणताही दौरा झालेला नव्हता. आता जवळपास तीन वर्षांनंतर पाकिस्तान पुन्हा आपल्या मंत्र्याला भारत दौऱ्यावर पाठवत आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री भारत दौऱ्यावर येत असल्याकडे लक्ष लागले आहे.
परिषदेत कोण सहभागी होणार?
या परिषदेसाठी भारताने मंत्री औरंगजेब खिची यांना आमंत्रित केले होते. मात्र, या परिषदेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व जलवायु परिवर्तन आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक करतील. त्यांना पाकिस्तान सरकारमधील अनुभवी मंत्री मानले जाते. पाकिस्तानने आपल्या घोषणेत म्हटले आहे की, हा कार्यक्रम शंघाई सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांचा आहे आणि त्यात काही मुद्द्यांवर चर्चा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये तियानजिन येथे झालेल्या शंघाई सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनात संवाद वाढवण्याबद्दल प्रस्ताव ठेवला होता. इस्लामाबादने म्हटले आहे की, शंघाई सहकार्य संघटनेच्या माध्यमातून सन्मान आणि संवादातून संबंध मजबूत करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावात होते आणि आता ते सुधारण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे.
Leave a Reply