छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाईंदरमध्ये किल्ले बनविणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांसह शहरातील सर्व वयोगटांतील नागरिकांना किल्ले निर्मितीची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन शालेय गट आणि खुला गट अशा दोन विभागांत करण्यात आले आहे. शालेय गटामध्ये शालेय विद्यार्थी तसेच शाळांना सहभागी होता येणार आहे. तर खुल्या गटामध्ये संपूर्ण शहरातील सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांनी आपल्या घराच्या परिसरात किंवा सोसायटीमध्ये किल्ल्याची निर्मिती करायची आहे. किल्ला तयार करण्यासाठी कोणतीही ठरावीक थीम किंवा गड निवडण्याचे बंधन नसून स्पर्धकांना आपल्या आवडीनुसार ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारता येणार आहे.
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर; थर्माकोल टाळण्याचे आवाहन
किल्ले निर्मिती करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. किल्ल्याची रचना, ऐतिहासिक माहिती, गडाचे वैशिष्ट्य, प्रवेशद्वार, बुरुज, तटबंदी, दरवाजे, माची आणि पाण्याच्या टाक्या यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या मांडणीला परीक्षणात विशेष महत्त्व दिले जाणार आहे. किल्ल्याची सजावट आकर्षक असण्याबरोबरच ती ऐतिहासिक दृष्टिकोनातून योग्य असणे आवश्यक आहे.
परीक्षक प्रत्यक्ष पाहणी करणार; पारितोषिके जाहीर
स्पर्धकांनी किल्ला स्वतः किंवा कुटुंबीयांच्या मदतीने तयार करणे अपेक्षित असून किल्ला बनवितानाचे फोटो आणि व्हिडिओ तयार करणेही आवश्यक आहे. किल्ला तयार झाल्यानंतर परीक्षक प्रत्येक सहभागीच्या घरी किंवा सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी स्पर्धकांना आपल्या किल्ल्याची संकल्पना, इतिहास आणि वैशिष्ट्ये परीक्षकांना समजावून सांगावी लागणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक म्हणून एका विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक चार विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक चार विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी २ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांची स्थापत्यशैली आणि स्वराज्याच्या पराक्रमाची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनासोबतच ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा आणि नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply