पुण्यातील येरवडा येथे झालेल्या बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेत नॉईज बॉईज एफसी, खडकी ब्ल्युज्, जीओजी ब आणि स्पोर्टीको एफसी या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. येरवडा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या उपांत्यपूर्व सामन्यांत या चारही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ही स्पर्धा येरवडा युनिटचे सेलेझियन को-ऑपरेटर्स, सॅक्रिड हार्ट पॅरिश आणि डॉन बॉस्को एज्युकेशनल कॉम्प्लेक्स (येरवडा) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे.
खडकी ब्ल्युजचा ५-० विजय; नॉईज बॉईज ४-१ ने पुढे
उपांत्यपूर्व फेरीच्या एका सामन्यात खडकी ब्ल्युज् संघाने मस्का एफसीचा ५-० असा धुव्वा उडवला. खडकी ब्ल्युज्कडून गोकुळ कोळी आणि श्लोक मोरे यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले, तर वॉल्टर सोलोमन याने एक गोल करत संघाचा विजय सुकर केला. दुसऱ्या एका लढतीत नॉईज बॉईज एफसीने स्निग्मय एफसीचा ४-१ असा पराभव केला. नॉईज बॉईजकडून निरंजन खुडे याने दोन गोल केले, तर अक्षय दगडे आणि आदित्य गंगे यांनी प्रत्येकी एकेक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. स्निग्मय एफसीकडून आदिक विनोज याने एकमेव गोल नोंदवला.
जीओजी ब आणि स्पोर्टीकोचे रोमहर्षक विजय
अन्य दोन चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये जीओजी ब संघाने फाल्कन्स् एफसी ब संघावर १-० अशी निसटती मात केली. आदित्य पाटील याने केलेला एकमेव गोल जीओजीच्या विजयासाठी निर्णायक ठरला. चौथ्या सामन्यात स्पोर्टीको एफसीने उत्कर्ष क्रीडा मंच संघाचा २-१ असा पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. स्पोर्टीकोकडून अनिकेत देवी आणि सिद्धांत नंदे यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर उत्कर्ष क्रीडा मंचकडून स्वराज पाटील याने एक गोल नोंदवून पराभवाचे अंतर कमी केले.
स्पर्धेचा संक्षिप्त निकाल
पहिला सामना — नॉईज बॉईज एफसी ४ (अक्षय दगडे ९ वे मिनिट; आदित्य गंगे २३ वे मिनिट; निरंजन खुडे ३९ वे, ४५ वे मिनिट) वि. स्निग्मय एफसी १ (आदिक विनोज ३५ वे मिनिट). दुसरा सामना — खडकी ब्ल्युज् ५ (गोकुळ कोळी ९ वे, २४ वे मिनिट; श्लोक मोरे ३१ वे, ३५ वे मिनिट; वॉल्टर सोलोमन ४३ वे मिनिट) वि. मस्का एफसी ०. तिसरा सामना — जीओजी ब १ (आदित्य पाटील ३५ वे मिनिट) वि. फाल्कन्स् एफसी ब ०. चौथा सामना — स्पोर्टीको एफसी २ (अनिकेत देवी १४ वे मिनिट; सिद्धांत नंदे २५ वे मिनिट) वि. उत्कर्ष क्रीडा मंच १ (स्वराज पाटील ४५ वे मिनिट).
Leave a Reply