नवे रातीर (तालुका बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याला मिळालेली दिशा यांची जाणीव ठेवत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला.
मेळाव्यात शाळेचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करण्यासह विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रयोगशाळा उभारण्याचा मानस शिक्षकांनी व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांचा शाळेसाठी सहकार्याचा संकल्प
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सजन आहिरे होते. यावेळी केवळ आहिरे, सरपंच विमल आहिरे, मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांच्यासह गावातील माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले, तर प्रास्ताविक पांडुरंग पाटील यांनी केले.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांविषयी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. शाळेने दिलेले शिक्षण आणि संस्कार यांची परतफेड करण्याच्या भावनेतून शाळेच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक बच्छाव, हेमंत निकम, सुजितकुमार देसले, जगदीश खैरनार, सोनालिका पवार आणि श्रीमती देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. ठोके यांनी आभार मानले.
Leave a Reply