नाशिकमध्ये भूसंपादनाशी संबंधित एक महत्त्वाची फाईल चार महिन्यांपासून पुढे सरकत नव्हती. वारंवार विचारणा करूनही ती पूर्ण होत नसल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही थेट संबंधित अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन तिथेच ठिय्या मांडला. तब्बल सहा तास ते तिथे बसून राहिले.
सहा तास पुस्तक वाचन, अधिकाऱ्याला मार्गदर्शन
या सहा तासांच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तक वाचन केले. त्याचबरोबर भूसंपादनाच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्याला मार्गदर्शनही केले. काम पूर्ण झाल्याशिवाय दालनातून हलायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. जिल्हाधिकारी स्वतः दालनात आल्याचे पाहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
सिंहस्थासह अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन सुरू
जिल्हा प्रशासनाकडे सध्या सिंहस्थ कुंभमेळ्यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. कामांचा वाढता व्याप लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती. त्यापैकी एका अधिकाऱ्याकडे दिलेले महत्त्वाचे काम चार महिने उलटूनही पुढे सरकत नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार विचारणा झाली की, आज पूर्ण करतो, उद्या करतो अशी उत्तरे मिळत होती. अखेर त्यांनी हा वेगळा मार्ग निवडला.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात; वरिष्ठांच्या सूचनांनंतरही एखादी फाईल मार्गी लावण्यासाठी चार महिने लागत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. एका फाईलसाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच सहा तास दालनात बसावे लागणे, ही प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाईची गंभीर बाब मानली जात आहे. शनिवारची सुट्टी असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या अनोख्या पवित्र्याची चर्चा महसूल विभागात रंगली आहे. महिनोनमहिने वाट पाहणाऱ्या फाईलींना आता या पवित्र्यामुळे गती मिळणार का, हा खरा प्रश्न आहे.
Leave a Reply