निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले. मात्र, तालुक्यातील सुमारे ३३ हजार शेतकरी अद्यापही पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे ही मदत त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेली नाही.
दुष्काळी पंचनाम्यांनुसार निफाड तालुक्यातील तब्बल ८८ हजार ३७३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. या प्रस्तावांमध्ये ६२ हजार १७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. संबंधित शेतकऱ्यांसाठी ८३ कोटी ४ लाख ३३ हजार रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाने केवळ ५५ हजार २४६ शेतकऱ्यांनाच मदत मंजूर केली आहे. त्यामुळे प्रस्तावित लाभार्थी आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येत आहे.
मदत का रखडली?
आधारकार्ड खात्याशी संलग्न नसणे, केवायसी पूर्ण नसणे, फार्मर आयडी नसणे याचबरोबर बँक खात्यावरील नाव आणि आधारवरील नावात फरक असणे, अशा असंख्य कारणांमुळे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकलेली नाही. दिवाळी उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन-चार दिवसांपूर्वी पाच हजार रुपये जमा झाले, मात्र अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत.
महसूल प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून त्या ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. लाभार्थी निवडीची प्रक्रिया, याद्यांमधील त्रुटी आणि निधी वितरणातील विलंब याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
फेरतपासणीची मागणी
शासनाकडे प्रस्ताव पाठवलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अग्रीम मदतीचा लाभ मिळणे अपेक्षित असताना हजारो शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लाभार्थी याद्यांची फेरतपासणी करावी, ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि मदतीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत त्वरित जमा करावी, अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.
शासनाने दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपये अग्रीम मदत म्हणून जाहीर करून ती शेतकऱ्यांच्या विविध बँकांच्या खात्यात जमा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, बँक खात्याशी आधार जोडणी, सामायिक क्षेत्र अशा अनेक बाबींमध्ये अडचण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता करून द्यावी. प्रत्येक गावानुसार महसूल अधिकाऱ्यांकडे याद्या दिल्या जात असून त्यांची पडताळणी केली जाणार असल्याचे निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
Leave a Reply