मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात छठपूजेसह कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक विधींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर मलबार हिल पोलिसांनी शनिवारी मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांना नोटीस बजावली आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी भूमिका
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाणगंगा तलाव परिसरात धार्मिक विधींमुळे होणारे प्रदूषण रोखण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार या ठिकाणी योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याचे निर्देश नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १२०३/१९९७च्या अनुषंगाने मलबार हिल परिसरात आमरण उपोषण, निदर्शने, आंदोलने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको, घोषणाबाजी तसेच विनापरवाना जमाव जमविण्यास मनाई असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई पोलिस अधिनियम १९५१च्या कलम ३७ (३) अन्वये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करणारा आदेशही लागू असल्याचे नोटिशीत नमूद आहे.
नोटीस भंग केल्यास कारवाई
पोलिसांच्या नोटीसचा भंग करून बेकायदा कृत्य केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच ही नोटीस संबंधित खटल्यात पुरावा म्हणून वापरली जाऊ शकते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंडलिक गाढवे यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a Reply