साक्री : राज्यात यंदा उद्भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साक्री तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण दिले आहे.
साक्री तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनामधून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने कपात केले आहे. याद्वारे जमा झालेली दोन लाख ७३ हजार ७८३ रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे कर्तव्य
अन्नदाता शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून साक्री तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मदतकार्यात सहभाग नोंदविला.
गोळा करण्यात आलेल्या मदतीचा धनादेश आणि विहित नमुन्यातील देणगीदारांची यादी नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालय तथा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सादर करण्यात आली आहे.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे आणि सामाजिक जाणिवेचे तालुक्यात कौतुक होत असून, या मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतकार्यास नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply