वातावरणात सतत होणारे बदल, धूळ आणि हानिकारक विषाणूंच्या वाढत्या प्रभावामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. वारंवार शिंका येणे, सर्दी, खोकला, घशात खवखव आणि डोके जड होणे अशी लक्षणे जाणवू लागतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर दैनंदिन कामे करताना अनेक अडथळे येतात. सुरुवातीच्या दिवसांत याकडे लक्ष दिले जात नाही, पण कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात आणि आरोग्य बिघडते.
खोकला किंवा सर्दी झाल्यानंतर अनेकजण मेडिकलमधून गोळ्या आणून खातात. पण वारंवार वेदनाशामक किंवा कोणत्याही गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. दिवाळी सणाला फटाक्यांमधील रासायनिक घटकांमुळे फुफ्फुसांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे सर्दी-खोकला कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. घरगुती उपायांमुळे शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही.
सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सर्दी झाल्यानंतर दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिणे फार आवश्यक आहे. कोमट पाणी प्यायल्यामुळे घशाला आराम मिळतो आणि सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र एकत्र खूप जास्त पाणी पिणे टाळावे. घशातील खवखव आणि सर्दी-खोकला कमी होत नसेल, तर कोमट पाण्यात मध मिसळून प्यावे. मधामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
खोकल्याची तीव्रता खूप जास्त वाढत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. फुफ्फुसांमध्ये संसर्ग वाढल्यास शरीरासंबंधी आजारांचा धोका वाढू शकतो. एक वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मध देणे टाळावे. घशातील खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. गुळण्या केलेले पाणी गिळू नये. सर्दी झाल्यानंतर वारंवार नाक चोंदत असेल, तर सलाईन ड्रॉप्स टाकावेत. नोझल स्प्रे टाकल्यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होईल.
आहार, विश्रांती आणि काळजी
घशाला आराम देण्यासाठी भाज्यांचे सूप बनवून प्यावे. सूप बनवताना आले, लसूण आणि काळी मिरी यांसारख्या पदार्थांचा वापर करावा. तसेच शरीराला विश्रांती द्यावी. सर्दी झाल्यानंतर धूळ, धूर, अगरबत्तीचा वास आणि सिगारेटच्या धुरापासून दूर राहावे. घरगुती उपाय केल्यानंतरही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून, कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply