दोन दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवा अचानक ठप्प पडली होती. त्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांचे रोजचे काम ठप्प झाले. अनेक कंपन्यांचे नुकसान झाले असून काहींचे तर एक टक्काही काम होऊ शकले नाही. या बिघाडामुळे विमान उड्डाणेही रद्द करावी लागली. १२ नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या समस्येमुळे आऊटलुक ईमेल, टीम्स मीटिंग आणि इतर महत्त्वाच्या सेवांचा वापर करता येत नव्हता. केवळ अमेरिकाच नव्हे, तर भारत, जपान आणि इतर अनेक देशांतील खासगी क्षेत्र, बँका, सरकारी विभाग आणि न्यायालयेही यामुळे प्रभावित झाली होती.
सायबर हल्ला की एआय? व्हायरल दाव्यांवर प्रश्न
या बिघाडामागील नेमके कारण काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अनेकांनी याला सायबर हल्ला म्हटले, तर काहींच्या मते मायक्रोसॉफ्टमधील ही समस्या एका अनियंत्रित झालेल्या एआय एजंटमुळे निर्माण झाली होती. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळे दावे फिरत होते आणि अनेक सिद्धांत मांडले जात होते.
कंपनीचे उत्तर काय?
सोशल मीडियावर फिरत असलेल्या सर्व दाव्यांना कंपनीने फेटाळून लावले आहे. मायक्रोसॉफ्टमधील को-पायलट, एजंट्स आणि प्लॅटफॉर्म विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष चार्ल्स लमाना यांनी एका पोस्टद्वारे म्हटले आहे की, तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना झालेल्या अडचणीबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि आम्ही ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. त्यांनी असेही स्पष्ट केले की, हे प्रकरण कोणत्याही दुर्भावनापूर्ण कृतीचा किंवा सायबर हल्ल्याचा परिणाम असल्याचे दर्शवणारे कोणतेही संकेत सध्या नाहीत. अधिक माहिती मिळताच ती शेअर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट आऊटलुक आता बहुतेक वापरकर्त्यांसाठी पुन्हा सुरळीत काम करत असून ईमेलचा साचलेला भार लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आशिया-पॅसिफिकसह बहुतेक क्षेत्रांमध्ये सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पूर्ण सेवा पूर्ववत होण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply