अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले असते, असा मोठा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. अजित पवार यांनी याबाबत आपल्याला आधीच पूर्वकल्पना दिली होती, असेही तटकरे म्हणाले. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. तो दावा खरा असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
भुजबळांचा दावा खरा असल्याचे तटकरे म्हणाले
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असे भुजबळ सांगतात. छगन भुजबळ यांची शस्त्रक्रिया एशियन रुग्णालयात झाली होती. त्यावेळी तटकरे त्यांना भेटायला गेले होते. त्याआधीच अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली होती. विलिनीकरणाची बैठक झाली होती, असे भुजबळ सांगतात ते खरे आहे, असे तटकरे म्हणाले. भुजबळ यांनी रुग्णालयातूनच चर्चेत भाग घेतला असेल. त्यामुळे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
योग्यवेळी आणखी बोलेन, तटकरे यांचे स्पष्टीकरण
अजित पवार गेल्यानंतर आपण यावर आधी का बोललो नाही, असा सवाल केला जात असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मी तेव्हा बोललो नाही, आता बोलत आहे, या प्रश्नात काही तथ्य नाही. कोणत्या वेळी काय बोलावे याची मला समज आहे. हा ज्याचा त्याचा विषय असतो. योग्य वेळी आणखी बोलेन, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या टीकेलाही तटकरे यांनी उत्तर दिले. उदय सामंत हे राष्ट्रवादीतील आपले एकेकाळचे सहकारी होते, असे तटकरे म्हणाले. मी काय बोलावे आणि काय बोलू नये यावर त्यांनी बोलण्याची गरज नाही. आमचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. आम्ही त्यांच्या पक्षाबाबत कधी बोलत नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदर राखतो. सामंत लोकशाही आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना मंत्री करण्यात आमचा थोडासा वाटा होता, असेही तटकरे म्हणाले.
Leave a Reply