एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (२०२६-२७) धुळे जिल्ह्याला विविध घटकांसाठी ९ कोटी ४४ लाख २४ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अधिकाधिक ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.
या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वनपट्टेधारक तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लक्षांक निश्चित करण्यात आला असून, त्यांना विविध कृषी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कोणत्या घटकांसाठी अनुदान
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात फळे, फुले व मसाला पिकांचा क्षेत्रविस्तार, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेट हाऊस, कांदाचाळ, पॅक हाऊस आणि पीक आच्छादन (मल्चिंग) या घटकांचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण आणि डाळिंब व द्राक्ष बागांसाठी गारपीट प्रतिबंधक जाळी म्हणजेच अँटी हेलनेट कव्हर यांचा समावेश आहे.
अनुदानाची मर्यादा
कांदाचाळ उभारणीसाठी २५ व ५० मेट्रिक टन क्षमतेनुसार प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी कमाल ७५ हजार रुपये, तर डाळिंब व द्राक्ष बागांसाठीच्या अँटी हेलनेट कव्हरसाठी प्रतिचौरस मीटर १०६.१६ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply