शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळी अंक, पुस्तके भेटवस्तू म्हणून ट्रेंडमध्ये

नाशिकमध्ये दिवाळी अंक आणि पुस्तकांच्या खरेदीला वेग आला असून, बुकेपेक्षा पुस्तकांचा सेट भेट देण्याचा ट्रेंड वाढला आहे; ४० ते ४५ नवीन पुस्तके बाजारात आली.

दिवाळी अंक, पुस्तके भेटवस्तू म्हणून ट्रेंडमध्ये

दिवाळीच्या हंगामात सुट्ट्यांमुळे मिळालेल्या निवांतपणात सध्या बाजारपेठेत दिवाळी अंक आणि पुस्तकांच्या खरेदीला वेग आला आहे. महाराष्ट्राला दिवाळी अंकाची मोठी परंपरा लाभली असून, २५ टक्के अंकांची दिवाळीपूर्वीच आगाऊ नोंदणी झाली होती. दिवाळीपासून ते संपूर्ण महिनाभर दिवाळी अंकांसह पुस्तकांना मागणी असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

अंकात विविध विषयांची मेजवानी

दिवाळी अंक वाचणारा विशिष्ट वाचकवर्ग आहे. अंकात मुलाखती, रिपोर्ताज, वैचारिक लेख, हलक्याफुलक्या विनोदी कथा, कविता, बालकथा, शब्दकोडे, रहस्यमय गूढकथा, विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अनेक घटकांवर विशेषांक बाजारात येत असल्याने वाचकांसाठी वाचण्याची पर्वणी असते. पुस्तकांच्या दुकानात दिवाळी अंकाबरोबर पुस्तकेही हाताळली जात असल्याने या काळात पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सध्या बाजारात प्रमुख प्रकाशकांची ४० ते ४५ नवीन पुस्तके आली असल्याने अंकाबरोबर पुस्तकांचीही विक्री होत आहे.

खास बालवाचकांसाठी बाजारात येणाऱ्या दिवाळी अंकांना विशेष पसंती मिळत असल्याने बालवाचकांना अभ्यासक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त वाचनीय अंक वाचायला मिळतात. कागद महागल्याने अंकाची किंमत यंदा दहा टक्क्यांनी वाढली असली तरी, अंकांना चांगली मागणी व प्रतिसाद मिळत आहे.

बुकेपेक्षा पुस्तकांचा सेट भेट देण्याचा ट्रेंड

दिवाळीत आप्तेष्ट आणि नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी सध्या पुस्तकं आणि दिवाळी अंक मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. बुके ठराविक काळाकरिता असतात, परंतु पुस्तक किंवा दिवाळी अंकाचा सेट भेटवस्तू म्हणून दिल्यास ती एक आठवण राहते. त्यामुळे बुके देण्यापेक्षा अंकाचा सेट भेट देण्याचा सध्या ट्रेंड आहे.

शहरात सार्वजनिक वाचनालयासह सुभाष सबनीस, पुंजाजी मालुंजकर, विजयकुमार मिठे, ब्रिजकुमार परिहार, गिरणा गौरव प्रतिष्ठान यांसारख्या संस्था वाचन चळवळ रुजविण्यासाठी स्थानिक दिवाळी अंक प्रकाशित करीत असतात. यामध्ये नागपूर, वर्धा, सातारा, कोल्हापूर, सांगली शहरांतून लेखक मंडळी लेखन करीत असतात.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance