शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोतवाल भरती परीक्षा स्थगित; आता १७ जानेवारीला परीक्षा

नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या १५६ जागांसाठी रविवारी होणारी परीक्षा सरकारने स्थगित केली आहे. १७ जानेवारीला परीक्षा होणार असून १८ जानेवारीला निकाल जाहीर होईल.

कोतवाल भरती परीक्षा स्थगित; आता १७ जानेवारीला परीक्षा

जिल्हा प्रशासनामार्फत महसूल सेवकांच्या (कोतवाल) रिक्त पदांसाठी रविवारी (१५ नोव्हेंबर) होणाऱ्या लेखी परीक्षेला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता १७ जानेवारीला परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील कोतवालांच्या १५६ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या पदांसाठी तब्बल चार हजार साठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजार एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. या पात्र उमेदवारांची रविवारी लेखी परीक्षा होणार होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने या परीक्षेला स्थगिती दिली. याबाबत गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाला आदेश मिळाले.

सहाही विभागांत १७ जानेवारीला परीक्षा

राज्यातील सहाही विभागांतील कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेला सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र, नाशिक व कोकण वगळता उर्वरित चारही महसुली विभागांत विधान परिषद निवडणुकांमुळे भरती रखडली होती. दरम्यानच्या काळात महसूल विभागाने गट अ ते ड पदभरतीबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आयोजित परीक्षेला राज्य सरकारने स्थगिती दिली.

सुधारित वेळापत्रकानुसार सहाही महसुली विभागांत १७ जानेवारीला लेखी परीक्षा होणार असून १८ जानेवारीला निकाल जाहीर केले जातील. त्यामुळे कोतवाल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance