सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारा चहा आता चांगलाच महागला आहे. वाढत्या महागाईचा फटका थेट चहाच्या टपऱ्यांपासून ते मोठ्या स्टॉलपर्यंत बसल्याने चहाप्रेमींसाठी ही खरोखरच कडू बातमी ठरली आहे. दूध, साखर, चहा पावडर आणि इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे चहा विक्रेत्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला असून, आता तलफ भागवण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत आहे.
नवीन दर काय आहेत
पूर्वी पाच-सात रुपयांत मिळणारा कट चहा आता थेट १० रुपयांवर पोहोचला आहे, तर फुल चहासाठी १२ रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी आणि नामांकित अमृततुल्यांमध्ये तर फुल चहाचा दर १५ ते २० रुपयांपर्यंत गेला आहे. केवळ साधा चहाच नाही, तर चहाच्या बदलत्या ट्रेंडनुसार मिळणारे इतर प्रकारही महागले आहेत. थंडीच्या दिवसांत किंवा आरोग्याची काळजी घेणाऱ्यांची पसंती असलेल्या मसाला चहा आणि ब्लॅक टीसाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, साखर न घेणाऱ्या म्हणजेच विदाऊट शुगर चहा पिणाऱ्यांना चक्क २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. तर कॉफीचा दरही सरासरी २५ रुपयांवर गेला आहे.
विक्रेत्यांची भूमिका
ग्राहकांचे बजेट कोलमडले असून दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या चहाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे. चहापत्ती, दूध आणि साखरेच्या किमतीत झालेली वाढ, तसेच इंधन आणि मजुरीचा वाढलेला खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल आणि टपरीचालकांच्या भूमिकेवर ग्राहक काहीसा नाराज आहे, परंतु वाढत्या महागाईमुळे जुन्या दरात चहा विकणे परवडत नसल्याने दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. महागाईच्या या उकळीमध्ये चहाची गोडी काहीशी कमी झाली असली, तरी खऱ्या चहाप्रेमींची तलफ मात्र त्यामुळे थांबणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply