कोणतेही नाते विश्वासावर आणि एकमेकांना समजून घेण्यावर टिकते. मात्र कधीकधी छोट्या छोट्या सवयी नकळत नात्यात तणाव निर्माण करतात. अनेकदा मुलं आपल्या अडचणी उघडपणे सांगत नाहीत, तर शांत राहणे पसंत करतात. त्यामुळे गैरसमज वाढतो आणि वादाची ठिणगी पडते. अशा पाच सवयी कोणत्या, ज्या नात्याला त्रासदायक ठरू शकतात?
१. सतत संशय घेणे
विश्वास हा नात्याचा पाया असतो. मात्र वारंवार जोडीदाराचा फोन तपासणे, मित्रांची नावे विचारणे आणि सतत प्रश्न विचारणे यामुळे समोरच्याला त्रास होतो. उगाच संशय घेतला गेला की सहनशक्ती संपते आणि वाद सुरू होतात.
२. मर्यादेबाहेर चिडवणे
हलकेफुलके चिडवणे वाईट नाही, पण त्यालाही मर्यादा असते. उठसूट कोणत्याही गोष्टीवरून चिडवले, चारचौघात खिल्ली उडवली किंवा जुन्या चुका वारंवार उगाळल्या तर ते अपमानास्पद वाटते. कामात अडथळा आणणेही याचाच भाग ठरतो.
३. सोबत असतानाही सतत फोनमध्ये मग्न राहणे
आजच्या डिजिटल काळात फोन हा जीवनाचा भाग झाला आहे. पण जोडीदार सोबत असतानाही फोनवर बोलत राहणे किंवा सोशल मीडियात बुडून जाणे समोरच्याला आवडत नाही. त्यामुळे तो दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण होते.
४. भावनिक दबाव टाकणे
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण प्रत्येक छोट्या गोष्टीचा बाऊ करणे, क्षुल्लक कारणावरून रडणे किंवा भावनिक ब्लॅकमेल करणे या सवयी समोरच्याला सहन होत नाहीत. अशा वागण्याला अनेकदा नखरे असेही म्हटले जाते.
५. इतरांशी तुलना करणे
प्रत्येक व्यक्ती वेगळ्या संस्कारांतून, वातावरणातून आणि क्षमतेसह घडलेली असते. त्यामुळे जोडीदाराची इतरांशी तुलना करणे योग्य नाही. तुलना केली गेली की समोरच्याला कमीपणा वाटतो आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.
या सवयी टाळल्या तर नात्यातील विश्वास आणि प्रेम टिकून राहण्यास मदत होते. छोट्या बदलांमुळेही नातं अधिक घट्ट होऊ शकते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply