काही वेळा नाश्त्याला नेहमीपेक्षा वेगळं आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी बटाटे आणि विविध भाज्यांपासून तयार केलेले क्रिस्पी बटाटा व्हेज कटलेट उत्तम पर्याय ठरू शकतात. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असणारे हे कटलेट सकाळच्या नाश्त्यासोबतच संध्याकाळच्या चहाच्या वेळीही खायला छान लागतात. विशेष म्हणजे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही रेसिपी तयार करता येते.
बटाटा व्हेज कटलेट बनवण्यासाठी साहित्य
- ३ ते ४ उकडलेले बटाटे
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १ मध्यम आकाराची सिमला मिरची
- १ मध्यम आकाराचे गाजर
- अर्धा कप मटार
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ इंच आले बारीक चिरलेले
- १२ ते १५ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ चमचे भाजलेले शेंगदाणे
- १ मोठा कप ब्रेड क्रम्ब्स
- अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड
- १ चमचा कसुरी मेथी, १ चमचा जिरे, १/३ चमचा हिंग
- ३ ते ४ चमचे तेल, १ चमचा मीठ
घोळ तयार करण्यासाठी: अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, १/३ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि १ कप पाणी.
बटाटा व्हेज कटलेट बनवण्याची कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या आणि त्यांचे साल काढा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेले आले-लसूण घालून दोन मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर आणि मटार घालून तीन ते चार मिनिटे शिजवा. आता त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार मसाल्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घाला. सर्व मिश्रण एकजीव करून सहा ते सात मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, ब्रेड क्रम्ब्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिसळा. तयार मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे कटलेटच्या आकाराचे गोळे तयार करा. आता एका भांड्यात मैदा, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून घोळ तयार करा. तयार केलेले कटलेट या घोळात बुडवून त्यावर कुस्करलेल्या शेवयांचे कोटिंग करा. एका खोल कढईत तेल गरम करून कटलेट सहा ते सात मिनिटे गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply