येवला तालुक्यातील सायगावात मंगळवारी रात्री मक्याच्या गंजीला लागलेल्या आगीत शेतकरी महेश सोनवणे यांचे मोठे नुकसान झाले. गंजीत साठवून ठेवलेला सुमारे तीन एकर क्षेत्रातील चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हा चारा त्यांनी दुसऱ्यांकडून विकत आणून साठवला होता, त्यामुळे या आगीमुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. जनावरांना चारा पुरवायचा कसा, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
रात्री आठच्या सुमारास आग
मंगळवारी (ता. १०) रात्री सुमारे आठच्या सुमारास गंजीला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच महेश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चारा वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
सायगाव येथील शेतकरी बाळासाहेब उशीर यांनी नुकताच नवीन जेसीबी विकत घेतला असून त्याची पूजा झाली होती. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जेसीबीसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि जेसीबीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मदतीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून अग्निशमन वाहनावरील कर्मचाऱ्याने चार हजार रुपये शुल्क आकारल्याने महेश सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, तसेच आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी शेतकऱ्यांना शुल्कमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply